घरगुती वापरासाठी किती ताकदीची घरघंटी खरेदी करावी?
सर्वसाधारणपणे एक एचपी (अश्वशक्ती) ची घरघंटी घ्यायला हरकत नाही.
एक एचपी घरघंटी गृहीत धरून यापुढील प्रश्नांची उत्तरे देत आहे.
घरघंटीत किती किलो धान्य दळून होते?
एका वेळी चार ते पाच किलो क्षमता व प्रति तास आठ ते दहा किलो वेग.
प्रति किलो धान्य दळण्याचा वीजेचा खर्च किती?
एक रुपयांहून कमी.
(सव्वा तास घरघंटीचा वापर झाल्यास अंदाजे एक युनिट, सव्वा तासांत कमीत कमी दहा किलो धान्य व युनिटचा दर पाच रुपये गृहीत धरल्यास.)
घरघंटीवर दररोज किती धान्य दळता येईल?
चाळीस किलो वगैरे.
विद्युतदाब सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत योग्य असायची शक्यता, या आठ तासांत अर्धा तास चालू व अर्धा तास बंद याप्रमाणे)
घरघंटी कोणत्या कंपनीची खरेदी करावी?
सध्या मार्केट मध्ये ब्रॅन्डेड- नॉन ब्रॅन्डेड अशा अनेक घरघंटी उपलब्ध आहेत, पन्नास शंभर नावं आढळतील. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जाणकार व विश्वासू दुकानातून घरघंटी खरेदी करावी, मग कंपनी कोणतीही असो.
घरघंटीची किंमत किती?
दर्जा व सेवा यातील तफावतीनुसार तसेच वैशिष्ट्ये व सोयी यातील फरकानुसार अगदी नऊ साडे नऊ हजारापासून एकवीस बावीस हजार रुपये पर्यंत किंमत असू शकते.
घरघंटीला कोणत्या देखभाल वा दुरुस्तीची गरज असते?
चाळण, कापड व ब्रश या वस्तू वापर होतील तशा वर्षभराने बदलाव्या लागू शकतात. पण फार महाग नसतात. बाकी सर्व्हो म्हणजे धान्य सोडणारी छोटी मोटर, सर्किट किंवा ज्याला कंट्रोलर वा कार्ड म्हणतात आणि कोड वायर सेट यावस्तू विद्युतदाब योग्य असल्यास दोन, तीन अगदी पाच वर्ष पण टिकतात. मुख्य मोटरचे वायंडिंग (कॉपरचे असल्यास (अल्युमिनिअम पेक्षा कॉपर नक्कीच चांगले) व घरघंटीचा एकूण वापर काळजीपूर्वक केल्यास) शक्यतो परत परत करायला लागायची शक्यता कमी. रोटर देखील (बहुतांश स्क्वायरल केज असल्याने) खराब होत नाही. बेअरिंग व कॅपॅसिटर कधीतरी बदलावा लागू शकतो. बीटर म्हणजे फिरणारे पाते (धान्यात खडा, स्क्रू, नाणे वा धातूचा किंवा कठीण तुकडा न गेल्यास) शक्यतो चांगले रहाते. चेंबर म्हणजे जिथे धान्य दळले जाते ती जागा हा सगळ्यात टिकाऊ पार्ट असतो, शक्यतो आयर्न कास्टिंगचे असावे (अल्युमिनिअम कास्टिंगचे नसावे) . होपर म्हणजे जिथून धान्य सोडले जाते (ते स्टेनलेस स्टीलचे व गोलाकार असल्यास) अनेक वर्षे टिकते. घरघंटीची कॅबिनेट पार्टिकल बोर्ड ऐवजी माड्युलर डेन्सिटी फ्रेमची असणे जास्त चांगले.
घरघंटीचा वापर कसा करायचा?
सगळ्यांच गोष्टी लिखित स्वरूपात देणे शक्य नाही. घरघंटी खरेदी केल्यावर/करताना प्रात्यक्षिक पहाणे योग्य ठरेल. तरीही सांगायचे झाले तर आवश्यक ती चाळण चेंबर मध्ये बसवून निवडलेले सुके धान्य होपर मध्ये टाकल्यास घरघंटी (स्वयंचलित असेल तरच) आपोआप सुरू होते व दळून झाल्यावर आपोआप बंद होते. काही घरघंटीना ज्वारी बाजरी दळण्यासाठी मोड हा नॉब अधिक चांगल्या प्रकारे दळण्यासाठी दिलेला असतो. प्रत्येक कंपनी, ब्रॅन्ड, मॉडेल यानुसार वापरायची पद्धत थोडफार वेगळी असू शकते. आपण आपल्या विक्रेत्याकडून प्रत्यक्ष समजून घेणे योग्य ठरेल.
Comments
Post a Comment