उद्योग - व्यवसाय, काल व आज
असे म्हणतात की "चेंज इज कॉन्स्टंट इन दी वर्ल्ड ॲन्ड कॉन्स्टंट इज चेंजिंग इन दी वर्ल्ड" (change is constant in the world & constant is changing in the world), आणि उद्योग व्यवसायाच्या विश्वात ही म्हण तंतोतंत लागू पडते, म्हणजे थोडंसं व्यत्यास स्वरुपात बदल हा सतत होत होता, होत आहे, होत रहाणार असे म्हणता येईल.
थोडंसं आमच्या लहानपणीच्या काळाचे दशक (1992 ते 2001) व सध्या पार पडलेले दशक (2015 ते 2024) याची तुलना उद्योग व्यवसायाच्या बाबतीत केली तर बदल हा अमुलाग्र झालेला दिसतो, जणू काही क्रांतिकारकच. याला कारण म्हणजे संदेश व दळणवळणाची वाढलेली साधने.
संदेश म्हणजे कम्युनिकेशन, विक्रेता व ग्राहक मधील यामधील कम्युनिकेशन. पहा पूर्वी विक्रेते दुकानासमोर पाट्या लावणे, वर्तमानपत्रात जाहिराती देणे, एखादे हॅन्डबिल सोडणे, अनाउन्समेंट करणारी रिक्षा फिरवणे याच माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत होते . वस्तू पहाण्यासाठी दुकानाला प्रत्यक्ष भेट देणे हा एकमेव पर्याय ग्राहकांसमोर होता. पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्स ॲप वर वस्तूंच्या फोटोचे स्टेटस ठेवणे किंवा फेसबुकवर अपलोड करणे, इन्स्टाग्रामवर , युट्यूबवर इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ पब्लिश करणे या पद्धतीने विक्रेते ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या अगदी पाच दहा हजारांत देखील स्मार्टफोन उपलब्ध असल्याने व दोन तीनशे रूपयांत महिन्याभराचे अनलिमिटेड कॉलिंग व इंटरनेट मिळत असल्याने शहरी भागा बरोबर ग्रामीण भागात देखील प्रत्येक जण सोशल मीडिया बरोबर कनेक्टेड आहे. आजकाल वर्तमानपत्रांनी देखील सोशल मीडिया गृप कार्यरत करून तिथे देखील जाहिराती प्रसिद्ध करण्याची सोय उपलब्ध करून देऊन काळानुसार बदल केला आहे. परिणामी वस्तू पहाण्यासाठी प्रत्यक्ष दुकानाला भेट देणे बंधनकारक राहिले नाही, तसेच कमी खर्चात जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. हा झाला संदेश म्हणजे कम्युनिकेशन मधील बदल.
दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्ट, वस्तूंचे कारखानदार ते विक्रेते व काही वेळा कारखानदार ते थेट ग्राहक असे ट्रान्सपोर्ट. पूर्वी ठराविक व निवडक ट्रान्सपोर्ट कंपन्या सदर काम करत असत, एक्स्प्रेस हायवे देखील नव्हते, परिणामी एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर किमान चार, आठ , पंधरा दिवस वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हताच. सध्या एक्स्प्रेस हायवे होत आहेत, रेल्वेची सोय कोकणात झाली आहे, ट्रान्सपोर्ट कंपन्या जास्त आहेत, त्यांच्या मध्ये स्पर्धा आहे. परिणामी राज्यातल्या राज्यात दोन ते तीन दिवसांत व आंतरराज्य देखील चार ते सहा दिवसांत वस्तू या ठिकाणावरून त्या ठिकाणी सहज उपलब्ध होत आहे. लॉजिस्टिक पार्टनर ही संकल्पना तर सध्या थर्ड डे, फोर्थ डे डिलेव्हरी अफ्टर कन्फर्म्ड ऑर्डर असे मिरवत आहेत. हा सगळा दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्ट मधील बदल.
संदेश व दळणवळण या बरोबर आणखी दोन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे उच्च शिक्षित तरुणांचा आपापल्या गावी राहून व्यवसाय करण्या कडे कल व डिजिटल पेमेंटची सुविधा.
पूर्वी उच्च शिक्षित तरुणांचा कल नोकरी (सरकारी किंवा खासगी) करण्याकडे जास्त होता, आजकाल सदर कल नोकरी इतकाच उद्योग व्यवसाय उभारण्याकडे दिसतो. ही तरुण पिढी सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने हाताळून उद्योग व्यवसायाची जाहिरात सहज करू शकते, इंटरनेटचा वापर करून वस्तूचे ट्रॅकिंग सहज करु शकते . मला पूर्वी वाटायचे की इंजिनिअरींगची पदवी घेऊन गिझर, प्युरिफायर, घरघंटीचा व्यवसाय करणारा माझ्या सारखा एखादा दुसराच असेल, पण अगदी शेजारच्या तालुक्यात डोकावून पाहिले तर राजापूरात देखील इंजिनिअर असलेले कुलदिप लांजेकर फ्रीज, टिव्ही, वॉशिंग मशीनचा व्यवसाय करताना दिसतात, आणि रत्नागिरीत सौरभ व राजीव देवळे या बंधूंनी पिढीजात ॲटोमोबाईल फॅक्टरीचा विस्तार करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी वा तत्सम मोठ्या पगाराची नोकरी सोडली व स्वतःच्या फॅक्टरीत रूजू झाले, आज महाराष्ट्राबाहेर देखील त्यांच्या ब्रॅंचेस आहेत. उच्च शिक्षित तरुणांचा उद्योग व्यवसायाकडे वाढता कल हा देखील बदल संदर्भातील टर्निंग पॉइंट आहे.
आता डिजिटल पेमेंट बाबत बोलूया, पूर्वी एकतर रोख रक्कम द्वारे व्यवहार करावे लागायचे, सुट्टीच्या दिवशी बॅंका बंद असतील तर रोख रक्कम काढण्यासाठी थांबावे लागायचे, चेकचा पर्याय निवडला तर पास होईपर्यंत कदाचित व्यवहार थांबायचे. आज कॅशची जागा घेतली आहे जी पे, फोन पे यांनी. आणि चेक ऐवजी एन ई एफ टी किंवा आय एम पी एस . सगळं कसं झटपट करता येण्यासारखे. हा आहे डिजिटल पेमेंट व डिजिटल इंडियाचा चमत्कार. फक्त मोठ्या वस्तूंसाठी नाही तर अगदी भाजी खरेदी केल्यावर, चहा प्यायल्यावर देखील ठिकठिकाणी क्यु आर कोड दिसत आहेत, हे असे असेल याची कल्पना निश्चितच पंचवीस वर्षे आधी नव्हती.
थोडक्यात उद्योग व्यवसायाची गती वाढण्याची कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट , तंत्रज्ञानाने समृद्ध तरुण पिढी, डिजिटल पेमेंट ही प्रमुख चार कारणे आढळतात. आणखी पंचवीस वर्षांनी कदाचित आणखी डेव्हलपमेंट झालेली असेल.
"डिमांड क्रिएट्स सप्लाय ॲन्ड सप्लाय क्रिएट्स डिमांड " (demand creates supply & supply creates demand) असे काहीसे निमशहरी भागां बद्दल म्हणता येईल.
थोडंसं लांजा शहराच्या बाबतीत बोलायचे झाले तर पूर्वी ग्राहक म्हणून अत्याधुनिक वस्तूंसाठी असलेले मुंबई, कोल्हापूरवरचे अवलंबित्व तुलनेने कमी झालेले दिसते. आज लांजा शहरांत लॅपटॉप व मोबाईल हॅन्डसेट, कृषी उपकरणे, गिझर, प्युरिफायर, घरघंटी, टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन याची भरपूर व्हरायटी हजर स्टॉक मार्केट मध्ये दिसत आहे, या संदर्भातील तंत्रज्ञ देखील स्थानिक पातळीवरच उपलब्ध आहेत, ग्राहकांनी सकाळी खरेदी करावी व संध्याकाळ पूर्वी इन्स्टॉलेशन इतकी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याच बरोबर लोकल मार्केट मध्ये देखील ग्राहकांना खरेदी साठी खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत, पूर्वी किराणा, कपडे, बांधकाम साहित्य, पुस्तके, खेळणी यांची मोजकीच दुकाने होती, आज यांची संख्या पाच दहा पटीने वाढली आहे, फक्त मॉल व ऑनलाईन कंपन्यांचे नव्हे तर शहरांतल्या शहरांत देखील खूप कॉम्पिटिशन आहे. तसेच या बरोबर टू व्हीलर शो रूम , टू व्हीलर/फोर व्हीलर सर्व्हिस सेंटर देखील उपलब्ध आहेत. हीच परिस्थिती कदाचित लगतच्या तालुक्यात देखील असावी.
नक्कीच आजकाल जागा, भांडवल या बरोबरच क्रिएटीव्हीटी , टेक्नॉलॉजी देखील जवळ असणे ही उद्योग व्यवसाय धारकांची सध्याची महत्त्वाची गरज आहे , कारण ग्राहकांपर्यंत पोहोचणे , व, उपलब्ध पर्यायांमध्ये दर्जा व सेवेच्या बाबतीत सर्वोत्तम ठरणे हे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
.. सुखानंद कुलकर्णी, बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स
(प्रोप्रायटर - मनिष सोल्युशन्स, लांजा
गिझर, प्युरिफायर, घरघंटीचे विक्रेते)
Comments
Post a Comment