खरेदी करताय?
स्थानिक ठिकाणी की अॉनलाईन?
नक्की वाचा
*एकसारख्या दिसणाऱ्या / एकसारख्या असणाऱ्या वस्तूंच्या दरात गावातील व्यावसायिक व अॉनलाईन व्यावसायिक यांच्या कडे फरक का हे ग्राहक वर्गाने जाणून घ्यावे.
काही ठराविक वस्तूंचा अॉनलाईन दर स्थानिक दरापेक्षा अधिक असतो , मूळ किंमतीच्या मानाने अॉनलाईन रेफरल, क्लोजिंग, शिपिंग, अदर फी जास्त होत असते या केसेस मध्ये.
व उर्वरित वस्तूंचा अॉनलाईन दर स्थानिक दरापेक्षा थोडा कमी असतो , याचे कारण व्यवसायाची रनिंग कॉस्ट व खरेदी स्किम यात तफावत होत असते या केसेस मध्ये.
म्हणजे अॉनलाईन असो वा स्थानिक , कार्यपद्धती ज्या त्या प्रकाराची वेगळी असते.
*नक्कीच खरेदी कुठे करायची हा ग्राहकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी निदान गावातील तुलनेने छोटया व्यावसायिकाचे गणित समजून घेऊन त्याची तुलना अॉनलाईन मोठ्या व्यावसायिकाशी करून अवहेलना वा खच्चीकरण तरी करू नये यासाठी हा लेख. शक्यतो गावातील व्यावसायिकाकडेच खरेदी करा हे आवाहन आहेच, पण ज्यांना अॉनलाईनच खरेदी करायची आहे त्यांचा "गावातील व्यावसायिक नफेखोरी करतो" हा गैरसमज दूर करण्याचा हा प्रयत्न.
*गावातील व्यावसायिक का टिकले पाहिजेत यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.
आपल्या गावातील व्यावसायिक एकाच ठिकाणी व्यवसाय करतो स्वतःच्या गावात. त्या ठिकाणचा खर्च उदाहरणार्थ चालू खाते व्याज, भाडे, लाईट बिल, मदतनीस पगार इत्यादी व अन्य काही. या खर्चाचा भार एकाच ठिकाणच्या विक्रीवर पडतो.
*याउलट*
अॉनलाईन व्यावसायिक पूर्ण देशभरात व्यवसाय करतो विशिष्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. त्यालाही एका ठिकाणचा खर्च येत आहेच. पण या खर्चाचा भार विशिष्ट एकाच ठिकाणच्या विक्री वर न पडता असंख्य ठिकाणच्या विक्री वर पडतो.
( एक महत्वाची गोष्ट म्हणजे गावात व्यवसाय करताना मुख्य मार्केटच्या नजिकच करावा लागतो जिथे खर्च अधिक येतो, तर अॉनलाईन व्यवसाय करताना कुठल्याही कोपऱ्यात करता येतो जिथे खर्च कमी येतो)
आपल्या गावातील व्यावसायिक होलसेल खरेदी करताना गावात सरासरी किती विक्री तो करू शकतो त्याला अनुसरून करतो, तुलनेने खरेदी विक्री कमी असते. व त्याला संख्येने मोठ्या स्किमचा लाभ घेता येत नाही.
*याऊलट*
अॉनलाईन व्यावसायिक होलसेल खरेदी करताना देशात सरासरी किती विक्री तो करू शकतो त्याला अनुसरून करतो, तुलनेने खरेदी विक्री जास्त असते. व त्याला संख्येने मोठ्या स्किमचा लाभ घेता येतो.
(आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल दहाला एक, शंभरला वीस, हजारला तीनशे अशा मोठ्या स्किम असू शकतात, टर्न ओव्हरचा अंदाज घेता याचा लाभ गावातील व्यावसायिक घेऊ शकत नाही व अॉनलाईन व्यावसायिक घेऊ शकतो )
*गावातील बहुसंख्य व्यावसायिकांना चांगल्यात चांगला माल विक्री करणे भाग आहे, कारण ग्राहक संख्या मर्यादित असल्याने ती कायम टिकवणे गरजेचे आहे, तसेच ग्राहक प्रत्यक्ष पाहून, थोडीफार हाताळणी करून खरेदी करणार असतो. आणि नंतर दर्जा व सेवे बद्दल उत्तर द्यायला स्वत: प्रत्यक्ष हजर असतो .
*
प्रत्येक अॉनलाईन व्यावसायिक दरवेळी खराब माल विक्री करतात असे अजिबात म्हणणे नाही, नाहीच मुळी. पण उल्लेखा अनुसार मनासारखी वस्तू न मिळायची थोडीतरी शक्यता असते. ग्राहक संख्या अमर्यादित असल्याने एखादा दुसरा ग्राहक कमी झाला तरी विशेष फरक पडत नाही. ग्राहकाला प्रत्यक्ष वस्तू पाहता व थोडीही हाताळणी करता येत नाही. दर्जा व सेवा याबद्दल उत्तर द्यायला कोणीही प्रत्यक्ष उपस्थित नसते.
*एकूण खरेदी विक्री वर होणाऱ्या खर्चाचा अधिभार यामुळे पडणारा फरक व एकूण खरेदी विक्री अनुसार मिळणाऱ्या स्किम यामुळे पडणारा फरक (लहानमोठे आणखी असंख्य मुद्दे आहेत ज्याची सामान्य मांडणी अवघड आहे, तरीही फक्त दोन मुद्दे लक्षात घेतले तर एकत्रित पडणारा फरक) एकत्रित पणे वेगवेगळ्या व्यवसायात पाच ते पंचवीस टक्के असू शकतो.
*या फरकाचा अर्थ कोणी नफेखोरी करतो असा अजिबात काढू नये, सध्या स्थानिक पातळीवरच स्पर्धा इतकी प्रचंड होत जात आहे की व्यवसाय करताना खूप परिश्रम घ्यावे लागत आहेत.
* तुलना करू नयेच, तरीही मोठ्या खरेदीसाठी करायची झालीच तर गावातल्या गावात एक दोन ठिकाणी दराचा अंदाज घेणे रास्त ठरू शकेल, एकाच गावात व्यवसाय करतात म्हणून, जवळपास सारखाच खर्च आहे व अंदाजे तितकीच संधी आहे म्हणून. गावातल्या गावात देखील दर्जा व सेवे अनुसार किंवा लहान मोठा व्यापारी या अनुसार दरात किरकोळ फरक आढळला तरी ठराविक प्रमाणात ठराविक धर्तीवर स्वीकारार्ह असायला हरकत नाही. पण गावातील व्यावसायिक व अॉनलाईन व्यावसायिक हे खूप वेगळे विषय आहेत.
गावातील व्यावसायिक का टिकला पाहिजे? पहा आता
-समजा रात्री अपरात्री एखादे औषध कोणाला तत्काळ हवे असेल तर अॉनलाईन व्यावसायिक देऊ शकतो की गावातील?
-कधीतरी अचानक संध्याकाळी उशीरा वर्षानुवर्षाची जुनी शेगडी बिघडली, दुरूस्त होण्यासारखी नाही,ती बदलून लगेच तत्काळ नवीन घ्यायची वेळ आली तर अॉनलाईन व्यावसायिक देईल की गावातील?
-परिक्षेला जाता जाता पेन हरवले तर अॉनलाईन मागवणार की गावात घेणार?
-कार्यक्रमात आयत्या वेळी पाहुणे वाढल्याने तत्काळ रिटर्न गिफ्ट कमी पडल्या म्हणून शर्ट पॅन्ट पीस किंवा साडी घ्यायची वेळ आली तर गावातला व्यावसायिक उपयोगी पडणार की अॉनलाईन?
-याशिवाय तुमच्या घर बांधणीचे वेळी व नंतर दर महिन्याचा किराणा घेताना तुमच्या नेहमीच्या गावातील व्यावसायिकाने जे सहकार्य केले असेल ते अॉनलाईन होऊ शकते का? खरोखरच गरज असेल तर वेळेला स्थानिक मेकॅनिक, वायरमन, प्लंबरच धावून येतात ना? की अॉनलाईन येते कोणी?
*आणि*
-स्थानिक स्वराज्य संस्थांना, सरकारी यंत्रणांना करवसुलीतून उत्पन्न कोणामुळे सहज प्राप्त होते : गावातून की अॉनलाईन?
आज प्रत्येक व्यापारी गाळ्यावर व्यावसायिक घरपट्टी आहे, प्रत्येक व्यापारी कमर्शियल इलेक्ट्रिक मीटर भाडे भरतो हे त्या त्या संस्थांना उत्पन्नच आहे ना.
-गावातल्या शैक्षणिक संस्थांना, प्रार्थना स्थळांना कुवतीनुसार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे लहान असो वा मोठी मदत कोण करतात : गावातील व्यापारी की अॉनलाईन व्यापारी?
बघा जुने तपशील तपासून.
-आपल्या गावातील जी मंडळी सरकारी कर्मचारी होऊ शकली नाहीत, ज्यांना प्रायव्हेट जॉब मोठ्या शहरात मिळाला नाही (कारण कोणतेही असो) ती मंडळी आज गावातल्याच दुकानात मदतनीस म्हणून रुजू आहेत, तिथे पगार म्हणून चार पैसे मिळवत आहेत,अॉनलाईन दुकानात नाही.
-अॉनलाईन व्यावसायिक जर प्रबळ होत गेले तर स्थानिक व्यावसायिक नाममात्र उरेल, त्याच्या वर अवलंबून असणारे बेरोजगार होतील. आर्थिक विषमता प्रचंड वाढलीच तर देशवासी गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत.
-सध्याच्या थोडक्या फायद्यासाठी भविष्यात मोठा तोटा सरसकट गावातील सगळ्यांनाच (व्यापारी व ग्राहक ) व्हायला नको असेल तर गावातील व्यावसायिक टिकला पाहिजे असे म्हणणे योग्य ठरेल.
*यावर सरकार काय करू शकते यावर सरकारने विचार करावा (अॉनलाईन व्यवसायाला काही मर्यादा व बंधने घालणे तर स्थानिक व्यवसायाला काही सूट व सोयी देणे यावर विचार करायला हरकत नाही)
*यावर कारखानदार काय करू शकतात यावर कारखानदारांनी विचार करावा ( अॉनलाईन व्यावसायिक एका वेळी भरमसाठ माल घेतो म्हणून त्याला नको तितक्या / तशा स्किम देणे बंद करणे, स्थानिक व्यावसायिक टप्प्याटप्प्याने माल घेत असला तरी त्याला काही स्किम देणे यावर विचार करायला हरकत नाही , ओरिजिनल ची फर्स्ट कॉपी / सेकंड कॉपी कशी येणार नाही यावर देखील)
*यावर स्थानिक व्यावसायिक काय करू शकतात यावर त्यांनी स्वतः एकत्रित विचार करावा (एखाद्या ब्रॅन्डची वस्तू तुम्हाला मिळणाऱ्या होलसेल खरेदी दरापेक्षा कमी मध्ये ग्राहकाला अॉनलाईन रिटेल विक्री दरात मिळत असेल तर त्या ब्रॅन्डच्या वस्तूंची विक्री स्थानिक बाजारपेठेतून कमी करणे यावर विचार व्हायला हरकत नाही ,तसेच आपण योग्य नफा कायम ठेवून कोणत्या मार्गाने थोडाफार अधिक डिस्काउंट ग्राहकाला देऊ शकतो यावर देखील)
-यावर ग्राहक काय करू शकतात यावर त्यांनी स्वतः विचार करावा , पण काही उपाय सुचवत आहे
_शक्य आहे त्यांनी स्थानिक व्यावसायिकांकडेच खरेदी करावी, काहीही असो.
-_अॉनलाईन खरेदी केल्यामुळे आपल्या एकूण उत्पन्नाला अनुसरून विशेष भली मोठी बचत होत नसेल तर प्रत्येकाने अॉनलाईन खरेदी टाळावीच, स्थानिक खरेदीच करावी.
_एवढे लक्षात आणून देऊनही ज्यांचा अॉनलाईनच खरेदी करायचा हट्ट आहे त्यांनी निदान प्रत्येक वस्तू, प्रत्येक वेळी स्थानिक ठिकाणी समोरासमोर तुलना करून खच्चीकरण करणे तरी टाळावे. (अॉनलाईनच्या दरात द्या,नाहीतर नको - असे म्हणू नये..तुम्हाला नाही पटले तर तुम्हाला पर्याय निवडायला कोण रोखणार? पण अवहेलना करू नये // चांगल्या हेतूने चर्चा करून सुवर्णमध्य निघतो का हे पहाणार असाल तर हरकत नाही. )
_शंभरला पाच ते पंचवीस रुपये फरक पडला तरी तो निव्वळ वाढीव नफा नसून फरक विविध मुद्द्यांमुळे आहे जे वर नमूद केले आहेत, हे लक्षात घ्यावे. बाकी जो तो सुज्ञ आहे.
_शेवटी ठाम विश्वासाने सांगतो, सर्व स्थानिक व्यावसायिक विक्री व सेवा दोन्ही क्षेत्रातले (अगदी तुरळक अपवाद वगळता ,अपवादाचे प्रमाण हजारात एक इतकेही नसेल व हा अपवाद सगळ्या क्षेत्रात असू शकतो) हे योग्य नफा ठेवून , सद् सत् विवेक बुद्धी ताळ्यावर ठेवूनच व्यवसाय करतात, ग्राहक हित जोपासतात. वर्षभर शक्यतो जादा सुट्टी वा विशेष रजा न घेता दररोज दहा बारा तास आपल्या शॉप मध्ये व्यवसायातील चढ उतार दुर्लक्षित करून हसतमुखाने आपल्या ग्राहकांच्या स्वागतासाठी हजर असतात.
_आणि हे लक्षात घेऊन शक्यतो नेहमी स्थानिक व्यावसायिकांकडेच वस्तू खरेदी करणाऱ्या असंख्य ग्राहकांचे आभार मानतो.
... © एस. व्ही. कुलकर्णी
(लांजा शहरातील एक स्थानिक व्यावसायिक,
वैयक्तिक फेसबुक वॉल वर सर्व प्रथम प्रसिद्ध :
दिनांक 01 अॉगस्ट 2024 गुरूवार, दुपारी 11:30
लेख आहे तसा शेअर करायला हरकत नाही)
टिप:
सदर लेख
- केवळ अॉनलाईन व्यवसायाला विरोध करायचा म्हणून लिहिला नसून अॉनलाईन व स्थानिक व्यवसाय यांच्या व्यवस्थेतील फरक ग्राहकांना लक्षात यावा या हेतूने लिहिला आहे.
-दोन्ही कडील दरा मधील फरक म्हणजे फक्त वाढीव नफा नसून इतर अनेक मुद्दे जे ग्राहक म्हणून सहजासहजी लक्षात येत नाहीत त्याकडे प्रकाश टाकण्यासाठी लिहिला आहे.
-लिहिताना काही त्रुटी व चूका झालेल्या असतील तर त्याबद्दल आधीच क्षमस्व म्हणतो.
-यामधील वाढीव शब्दसंख्ये बद्दल दिलगिर आहे, पण सर्व सामान्य वाचकाला सहज लक्षात यावे हाच एकमेव हेतू.
धन्यवाद
sharing allowed ,
but without alterations
(7090 characters total Including this row)
Comments
Post a Comment